वाळूज एमआयडीसीतील पॉलिमर कंपनीला आग

Foto
 वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सुप्रीम सिलिकॉन्स केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना सोमवारी (दि.२७) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. यात कंपनीतील कच्या मालासह यंत्र जळून खाक झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. 

दरम्यान, तब्बल दोन ते तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. व अभिजित सूर्यवंशी अभिजित गोस्वामी रा. छत्रपती संभाजीनगर यांची वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एच-५५ येथे सुप्रीम सिलिकॉन्स नावाची केमिकल कंपनी आहे. यात सिलिकॉन केमिकलचे उत्पादन करून विविध कंपन्यांना ते पुरवठा करतात. यात १८ ते २० कामगार एकाच शिफ्टमध्ये काम करतात. दरम्यान, सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास केमिकलसाठी लागणारे पाणी गरम करत असताना अचानक एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर बाजूलाच असलेल्या केमिकलच्या बॅरलला आग लागल्याने भडका उडला. ही आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले, मात्र आग आटोक्यात येत नसल्याने खाजगी पाण्याचे १२ ते १५ टैंकर व बजाज व गरवारे कंपनीचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.  

त्यानंतर तब्बल दोन ते तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, अनिल पाटील, दिलीप चौधरीसह पदधिकाऱ्यांनी भेट दिली. दरम्यान, यावेळी कंपनीसमोर बध्याची मोठी गर्दी झाली होती.
कोट्यवधीचे साहित्य खाक ; 
आगीत कंपनीतील तीन ते चार मिक्सर मशिन, गॅस सिलिंडर, कच्चा माल, पक्का माल, केमिकल ड्रम, फर्निचरसह विविध साहित्य जळून खाक झाले. तर इमारातीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात अंदाजे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.